Sunday, October 6, 2013

कविता Personified

तू नव्हतीस तोवर,
लिहायचो काहीतरी,
जाणवायचा तो फक्त
भावनांचा गोंधळ....

पण एक दिवस तुला पाहिलं..
कविता अशी अंगा-खांद्यावर खेळवताना
वाटलं पकडावं तिला कागदात
बांधून ठेवावं काळ्या शाईत
ऐनवेळी उपयोगी येईल

पण ती एकदम खट्याळ
रात्री उशाशी येऊन बसली
डोळ्यातली झोप काढून त्या जागी
अशक्य पण सुंदर स्वप्नं भरत
नजरेच्या रस्त्याने काळजात हात घालते
२-४ ठोके अडवून धरते
जीव घाबरला की हसत सोडून देते
वैतागून धावलो तिच्या मागे
ती ही धावत होतीच,
प्रतिभेला वाकुल्या दाखवत,
कुठे कुठे गोल गोल फिरवलं, दमवलं,
मग हसत राहिली माझी फजिती पाहत, 

एकदा खेचलचं तिला कागदावर
बावरली, घाबरली ती
अाणि पूर्वीसारखी जाणवलीच नाही,
अगदी कोमेजून गेली
खूप प्रयत्न केला, पण
गिरवायला जमलीच नाही

मग दिलं सोडून...
असू देत तुझ्याकडेच तिला...
तुझ्यावरच छान खुलते ती
अाणि तुझ्याच बरोबर 
छान मिरवून घेते स्वत:ला
जप तिला..अाणि सांग
वहीत तिची जागा
राखून ठेवली अाहे
मोरपिसाशेजारी,
कधीतरी ये अापणहून
तिथे रहायला

Friday, July 19, 2013

मैहफ़िल मैं अब कौन हैं अजनबी...

"तो" आणि "ती" नेहमी जातात
त्या मैहफ़िलीला बरोबर....

"ति"ला नाही आवडत बहुतेक...
काय सारखी तिच तिच गाणी..
गाणारे ही तेच...
काहीच नियम नाहीत ह्या
मैहफ़िलीचे....
कधी हिंदी, कधी मराठी
तर कधी मध्येच इंग्रजी गाणी
कधीही सुरु होते....
रात्री, अपरात्री, पहाटे,
किती वेळ चालेल
काहीच अंदाज नाही..

३ खुर्च्या नेहमी रिकाम्या
ठेवायचा तो..
त्याच्या उजवीकडे, मागे
आणि मागे उजवीकडे..
"ति"ला ते समजायचं नाही..
"ति"ला काहीच समजायचं नाही..
"ती" विचार करायची,
"कशाला नेतो मग हा मला बरोबर?"
तो म्हणायचा,
"बाहेरच्या गोंधळातुन तू मला
ह्या शब्द, सुरांच्या सोहळ्यात
मिरवुन आणतेस"
"ति"ला हेही समजत नाही..
पण "ति"चा नाईलाज असतो...
"ती" आपली धावत असते
चार चाकांवर....

"त्या"ला नेहमी वाटायचं.....
"ती" ही असावी मैहफिलीत शरीक..
अगदी अशीच......



Saturday, June 29, 2013

इदं न मम - १

कुठे कुठे वाचलेल्या, ऐकलेल्या अाणि अावडलेल्या कविता अाणि शेर.

रात बहुत है, प्यास बहुत है, बरसातों की बात करो,
खाली जाम लिए बैठे हो, उन आँखों की बात करो !!
-- भक साला

कुछ नब्ज़ें सूख के टूट गयी
समेट रखी हैं मैने
बड़े दिन हुए तुम्हारे लफ्ज़ चखे
आओ दिल के चूल्‍हे में
इन सूखी नब्ज़ों को छूकर
साँसों की आँच उठाते हैं
आओ बैठो
निगाहों से इक बात पकाते हैं
-- बदनाम परिंदे

तुम्हारा खयाल ही इतना रेशमी है सनम
के हमारा वजूद उस में कहीं फिसल जाता है ।।
-- भक साला

इन बादलों के मिज़ाझ मेरे मेहबूब से मिलते है
कभी टूट के बरसते है...
कभी बेरूखी से गुज़र जाते है ।।
-- भक साला

दिल अपना हम, सिगरेट में रख कर जी लेते हैं
मौका मिलते ही, जला कर कश में पी लेते हैं
-- unknown

दुवा करो मेरी खुशबू पे तबसिरा ना करो
के एक रात में खिलना भी था, बिखरना भी था ।।
-- कैसर-उल-जाफ़री

जुदाई तो मुकद्दर है फिर भी जान-ए-सफर
कुछ और दूर जरा साथ चल कर देखतें है ।।
-- फ़राझ

वो लजायें मेरे सवाल पर
के उठा सकें ना झुका के सर
उड़ी झुल्फ़ चेहरें पे इस तरह्
के शबों के राझ मचल गये

मेरे लब पे जो ना अा सकें
मेरे दिल में इतनें सवाल थे
तेरे दिल में जितनें जवाब थे
तेरी इक निग़ाह में अा गयें ।।
-- (unknown - Ref: Rakesh Bedi, Old Chashme Baddur)

Tuesday, June 4, 2013

शब्द

वेळ ना काळ
कधीही, कुठेही सुचतात..
नव्हे सुचल्यासारखं करतात...
पेन शोधेस्तोवर
पळून जातात...
तू समोर आलीस की
पळतात ना...
तसेच...
मी आपला कावराबावरा होऊन
शोधत असतो त्यांना
हरवून जातो कुठे तरी
तुझ्या डोळ्यांत हरवतो
तसाच..
तू विचार करतेस...
"हा असा गप्पं का एवढा?"
माझा नेहमीचाच गोंधळ
बोलायला शब्द शोधू?
की तुझ्या डोळ्यातून वाट?

-------------------------------

फार शेफारले आहेत आता ते...
तुझं कौतुक करताना
शब्दांचे जे लाड केलेत...
की आता सुचतच नाहीत...
कुठल्याही अलंकारात ते आता
स्वत:ला सामावून घेत नाहीत
कुठल्याही व्रुत्ताचे, छंदाचे नियम
पाळत नाहीत..
वयात आलेल्या मुलांसारखं
मोकाट हुंदडत असतात...
घालतात मनामध्ये दंगा
त्या उनाड उर्मीतून निपजलचं काही
तर उतरवुन घेईन कागदावर....
तोवर माझ्याकडे
देण्यासारखं काहीच नाही...

------------------------------------

तू मात्र आता शब्द जपुन वापर...
त्यांची कविता करण्यची किमया
तुझ्या आवाजात आहे...
तू लाख बोलशील गं...
पण माझ्या लेखणीला मर्यादा आहेत...

----------------------------------------

Saturday, October 29, 2011

ताजमहालाला वीटा - १

कधी कधी मोह अनावर होतो...........

एक सुंदर उमललेलं गुलाबाचं फूल...
ते तोडायचा मोह होतो...

कल्पनेच्या पलिकडे एखादे सुंदर चित्र
निसर्गाने आपल्या दैवी creativity ने
चितारलेले असते...आणि...
camera च्या सहाय्याने त्या चित्रात
आपण आपले थोबाड चिकटवुन त्या चित्राची
रयाच घालवुन बसतो....

एक सुंदर मुलगी वर्गात येते...
कित्येक ह्र्दयांचे ठोके चुकवते...
तेव्हा उठणारी कळ अगदी हवीहवीशी वाटत असते...
जणु कधी संपूच नये....
आणि हे माहित असुन देखील की ती आपल्या league च्या बाहेर आहे....
आपण शेंबड्यासारखे तिच्याशी बोलायला जातो....

नाटकामध्ये additions घेणाऱ्या कलाकारांबद्द्ल आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते की...
"आम्ही ताजमहाल बांधला आहे, त्याला उगाच कलाकरांनी वीटा लावू नयेत..."

कधी पटतं, कधी खटकतं...
काही photos येतात चांगले....

मुळात निसर्ग काय किंवा ताजमहाल काय किंवा आणखी कोण काय...
सगळेच अलौकिक....
अशा वीटा ते स्वत:मध्ये सामवुन घेतील..
नाहीच आवडल्या तर त्याच फेकून मारतील....

शैलेंद्र ह्यांची माफी मागुन.....
सलिल चौधरी ह्यांची मदत घेऊन...(चालीवर लिहिल आहे ना....)

"दिल कहीं फिसल न जाये इस खयाल से...
के दिल की आरज़ु कदम कदम पे खिल उठें...

दिल तडप तडप के कह रहा हैं आ भी जा...."



Sunday, March 13, 2011

मुख्तसरसी बात है....................




उगाच दु:ख कवटाळुन बसत नाही कोणी.....
एकांती कधी त्याचीच सोबत असते...
हळुच थोडे सुख लपवून आणते ते कुशीत...
तुझे डोळे, तुझे हास्य, तुझ्या आठवणी......आणि कविता....

प्रत्येक भेटीत असायची हुरहुर.....आज काय नविन....
पण आजकाल फार तोच तोच पणा आला आहे....
नविन स्वप्न नाहीत...
नवी दिशा नाही.....
शुन्यात हरवली वाट...
तिला अंधाराची साथ....
म्हंटलो होतो रागाने... की.. तुझ्या आठवणींवर जगेन....
पण वाटलं नव्हतं....ते इतके अवघड असेल.....

परत भेट कधी.....फ़ार नाही चार शब्द बोलु कधी...
असेच समुद्र किनारी...संध्याकाळी...
जेव्हा सूर्य निळ्या आभाळी रंग भरत असेल...
आणि जाता जाता चित्र नाही आवडलं म्हणून
ओतेल काळा रंग त्या चित्रावर....

पण तु असलीस की होईल ती पौर्णिमेची रात्र...
मऊगार वाळुत चालताना..
प्रत्येक पावलामागे ठेव एक चांदणी त्या आभाळी....
आणि प्रत्येक चांदणीमागे मी ठेवीन एक आठवण ...तुझी ...माझी...
असेच चालत राहु....जोवर हे चित्र पुर्ण होत नाही.. तोवर...

सकळी मग तो सूर्य जळेल आपल्या चित्रावर....
पुसुन टाकेल ते चित्र निळ्या रंगाने....
त्याला काय माहित की...

काही चित्र कायमची मनात कोरली गेली असतात...
"वाळुत मागे उरले पाय" याहीपेक्शा बरीच काही सांगतात....
प्रत्येक रात्री बघीन त्या चांदण्यांकडे
उलगडेल तुझी माझी एक आठवण....
निघून जाईल ती रात्र त्या आठवणीत....
ती रात्र.....अशा अनेक रात्री....दिवस....महिने....वर्षं....

बघ तेवढं जमलं तर.....
तुझ्यासारख्या नक्शत्र देशींच्या लोकांना फार अवघड नाही...
तेवढाच एक जन्म पूर्णत्वास जाईल....
नाहीतर एक कवी उगाच भटकत राहील....



Sunday, January 18, 2009

Some days to remember "same" days to forget

१४ जानेवारी, १७६१

" जरीपटक्याचा हत्ती इकडेतिकडे चीत्कारत उधळू लागला. सूर्य अस्ताकडे चाललेला. जरीपटक्याचा नेहमीचा हसरा फरारा आता मलूल दिसत होत. त्याच्या रक्षणासठी उरलेसुरले मराठे प्राणाची बाजी लावू लागले, भोवतीने झोंबू लागले. "

" जरीपटक्याजवळ दाटी झाली होती. डोळ्यांदेखत गिलचे मराठ्यांच्या मानाचे पान नेणार, ह्याचे वैषम्य उरल्यासुरल्या स्वारांना वाटले. त्यांनी हत्तीवरचा जरीपटका खाली घेतला, घोड्यावर घातला. गिलचे हटेनात, निशाणाची पाठ सोडेनात, तसे स्वारांनी निशाण गुंडाळले. ते घेऊन स्वार बाजूला पळू लागले. भाऊंची जिद्द, धमक आणि हिंमत अजून बुझली नव्हती, बुझणार नव्हती. रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत रण लढावयाचा त्यांचा निर्धार पक्का होता."

" जनकोजीचा चुलता तुकोजी शिंदे घोडी उडवीत भाऊंना भिडला. कळवळून बोलला, "भाऊS, क्षात्रधर्माची शर्थ झाली! महाराष्ट्र लोकी आपल्यासारखा कोणी मायेच पूत अस झुंजला-झगडला नाही. याउपर आपण निघाल तर उत्तम आहे."

भाऊसाहेब विषण्ण मनाने हसले. गदगदल्या शब्दांत म्हणाले, "अरे तुकोबा, आता कोणीकडे जावे? रावसाहेबांची काय गत झाली? याउपर पुण्यास काय म्हणून तोंड दाखवावे? ह्या कवडीमोलाच्या साडेचार हात देहाची क्षिती ती काय बाळगावी? याउपरी इथेच लढावे, लढता लढता मरावे, मरुनी घडावे."

हजारो गिलच्यांची सभोवती दाटी झाली होती, तरी गिलच्यांत घुसून भाऊ एकसारखे झुंजत होते. इतक्यात गिलच्यांनी चार-पाच फैरी झाडल्या. त्य भाऊंच्या अंगाखालच्या घोड्याच्या छाताडात घुसल्या. घोडा रक्ताच्या गुळण्या टाकीत खाली कोसळला. किती तरी वेळ एकाकी भाऊ झुंजत, झगडत होते. धुराने, धगीने, घामारक्ताने त्यांचे सर्वांग माखले होते. हे भाऊ की अन्य कोणी हे ओळखू येत नव्हते. म्रुत्यूचा मुका घेण्यासाठी भाऊसाहेब आसुसले होते; पण म्रुत्यूच आपले काळे तोंड लपवीत त्यांना चोरासारख्या हुलकावण्या देत होता. भाऊंनी बाजूस पाहिले. ३०-४० खंदा मराठा सोडला तर भाऊसाहेबांना आपले कोणी दिसेना. कलाबुताच्या गोंड्यांनी गुंफलेल्या भरजरी झालरा घातलेली घोडी नाहीत की गेंद भरलेले हत्ती नाहीत. अंबाऱ्या नाहीत, हौदेही नाहीत. ना पालख्या, ना आबदागिऱ्या! सभोवती काळेनिळे, धुरकटलेले खिन्न आभाळ, रक्ताचे असंख्य पाट वाहिल्याने काळजाचा थरकाप उडालेली धरती, कोंदट अंगात धुंदफुंद कापरे भरलेली हवा, भयभीत आसमंत. सूर्य अस्ताला चाललेला, त्याची दोन चोरटी किरणे, धुराधगीच्या गर्दीतून भाऊंचे दर्शन घेण्यासाठी पालथी पडलेली.

एकाएकी भाऊंना कोठल्या तरी स्वाराचे एक भीमथडी तट्टू बाजूला उभे असलेले दिसले. तेही रक्तात न्हालेले. खासा भाऊ पुढे धावला. भाऊंनी तिसऱ्यांद मांड ठोकली, हातात तलवार-भाला घेऊन भाऊ झुंजू लागला. पण, जंबुऱ्याचा एक तडाखा भाऊंच्या मांडीवर बसला. आगीच्या ठिणग्या आणि मांसाचे तुकडे बाजूला उडाले. पाठोपाठ त्याच मांडीवर जमदाड्याचा तडाखा बसला, जखमा जिव्हारी लागल्या. उभ्या देहाचा लोळागोळा करणाऱ्या कळा येऊ लागल्या, असह्य वेदनेने भाऊसाहेब घोड्यावरून बाजूला कोसळाले, "हेS भवानी, श्रीमंतSS श्रीमंतSS" असा शब्दोच्चार करीत भाऊ रक्ताच्या थरोळ्यात पडले.

अजून भाऊंच्या उरातली जिद्द, रग, धग मावळली नव्हती. डाव्या हातातल्या भाल्यांचा काठीसारखा उपयोग करीत आणि दुसऱ्या हाताने असह्य कळा-वेदना दाबत भाऊसाहेब तसेच उठले. स्वप्नातून उठल्यासारखे! डोळ्यांत रक्त साकळलेले. भाऊंच्या पुढ्यातच चार हातांवर पाच गिलचे हातात फरश, कुऱ्हाडी, भाले घेऊन दैत्यासारखे खडे होते. पाच गिलचे हातातल्या शस्त्रानिशी पुढे आले. तोच अंगातले उरलेसुरले बळ एकवटून भाऊंनी एका हाताने भाला उंचावला. रक्त-अश्रूंनी डबडबलेल्या त्यांच्या डोळ्यांनी गिलच्यांच वेध घेतला, असंख्य कळा-वेदना दाबत भाल्याचे सपासप चार वार केले. एकापाठोपाठ एक असे चार गिलचे उलथे-दुणते होत खाली कोसळले. अतिश्रमाने दमलेल्या भाऊंच्या डोळ्यांवर अंधारी आली. पाचव्याच्या समाचारासाठी त्यांनी जिवाच्या जोराने भाला उंचावला. तोच स्वर्ग आणि प्रुथ्वीच्या सीमारेषेवर मघापासून अडखळलेल्या भाऊंचे प्राणपाखरू भुर्रकन उडून गेले. हातातला भाला तसाच खाली गळून पडला. तालीमबाजीचा बळकत, चिवट देह, जिद्दी जिवाला सोडून बाजूला मुडद्यांच्या राशीत कोसळला. बहाद्दर सोबत्यांच्या मुडाद्यांत मुडदा मिसळला.

त्याच दिवशी, त्याच वखताला महाराष्ट्र देशी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत होता. घराघरांत, तव्यातव्यांवर पुरणपोळ्या चर्रचर्रत होत्या. तेव्हा कळीकाळाशी झोंबी घेता घेता चिमाजीअप्पांचा सदशिवभाऊ नावाचा ऐन तिशीतला वेडा पोर दूर पानिपताच्या अटिंग्या रानी चिरनिद्रा घेत होता.

"
आज अख्खा हिंदुस्थान माझ्या मुठीत आला आहे; पण ह्या घडीला त्या काफरांच्या पराक्रमाच्या कथासुद्धा विसरून चालणार नाहीत. इतक्या दिवसांचे उपाशी असून, दुष्काळाच्या तडाख्यात एवढे होरपळूनसुद्धा सारे पठ्ठे जान कुर्बान करून लढले. पोटाच्या गाण्याने हैराण झालेली, उपाशी, कंगाल अशी घोडी, माणसे जगाच्या इतिहासात क्वचितच लढली असतील. शहावलीS, अगदी दिलातली बात बोलायची तर आपल्या पुराणकाळातील रुस्तुम आणि इस्फिंदारसारखे महायोद्धे आजच्या रणावर हजर असते तर त्या काफरांचा महान पराक्रम पाहून त्यांनीही अवाक होऊन तोंडात बोटे घालून कराकरा चावली असती.", दुराणी बादशाह मसलतीतून निघून गेला.

-- पानिपत, विश्वास पाटील

इतिहासातून आपण तसेही कधी काही शिकत नाहीच, किमान त्या इतिहास घडावणाऱ्या पराक्रमाच्या गोष्टी त्या त्या दिवशी आठवून तरी बघाव्यात, म्हणून..... मराठी संक्रांत वाईट का समजली जाते? संक्रांत कोसळते हा वाक्प्रचार कसा आला? मराठी माणसाच्या पराक्रमाचे उत्तुंग टोक आणि पानिपताच्या दारूण पराभवामुळे मराठी माणसाची कच खाण्याची व्रुत्ती ह्या दोन्ही गोष्टी एकाच दिवसाच्या घटनेशी निगडीत आहेत का? असे काही प्रश्न (उत्तरे).. इतिहासातून शिकणाऱ्यांसाठी.....